Thursday, January 21, 2016

काहीतरी नक्कीच संपलय...

मामाचं पत्र हरवलंय की
पत्र लिहिणारा मामाचं हरवलाय ?
एक काहीतरी नक्कीच हरवलंय !

कोंबड्याचं आरवण थांबलंय की
ती सकाळ व्हायचीच थांबलीय ?
एक काहीतरी नक्कीच थांबलय !

पाटीवर अभ्यास लिहायचा राहिलाय
की आमची पाटी कोरीच राहिलीय ?
एक काहीतरी नक्कीच राहिलंय !

मऊ वरण-भात करपलाय
की आमची जीभच करपलीय ?
एक काहीतरी नक्कीच करपलय !

संवाद कमी झालाय
की विसंवाद वाढलाय ?
एक काहीतरी नक्कीच झालंय

आमचं वय वाढलंय
की आमच्यातलं अंतर वाढलंय ?
एक काहीतरी नक्कीच वाढलंय

शुभं करोति म्हणायचं विसरलोय
की शुभ म्हणजे काय तेच विसरलोय ?
एक काहीतरी नक्कीच विसरलोय !

रामाची गोष्ट संपली आहे
की प्रत्येक गोष्टीतला रामच संपलाय ?

एक काहीतरी नक्कीच संपलय !!

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.